Skip to main content

समीक्षकांची समीक्षा!!

काल क्रान्तीने काम केलेला किरण कुलकर्णी VS किरण कुलकर्णी रिलीज झाला.. आणि त्याच्या आलेल्या रिव्ह्यूजने सिनेइंडस्ट्रीशी रिलेटेड अनेक व्हॉट्सअप ग्रुप दणाणून सोडले.. विषय होता वेगवेगळ्या समीक्षकांनी दिलेल्या टोकाच्या प्रतिक्रिया.. काही मोजक्यांनी अकारण सिनेमाला खूप झोडपल होतं आणि इतर समीक्षकांनी मात्र सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं.. कुणाचं योग्य कुणाचं अयोग्य हा वादातीत मुद्दा म्हणावा पण समीक्षणाचा मराठी सिनेमांवर आणि एकंदरच मराठी सिनेसृष्टीवर होणारा परिणाम यावर काल चांगलाच वाद रंगला आणि अनेक मुद्दे, रादर अनेक लोकांच्या मनातली खदखद बाहेर आली!
समीक्षक आणि सिनेमा मेकर्स हा वाद तसा प्राचीन.. सिनेमा बनवणाऱ्यांना नेहमीच समीक्षक खटकत आले आहेत आणि समीक्षकांनी नेहमीच मेकर्सच्या कलाकृतींची मोजमाप काढली आहेत.. काही दिगदर्शकांना सेन्सरबोर्ड जितका जाचक वाटतो तितकेच हे समीक्षक डोळ्यात खुपतात.. आम्ही इतकी मेहनत करून, खर्च करून सिनेमा बनवतो पण हे समीक्षक सरळ सरळ आमची बुराई करतात, सिनेमाला वाईट म्हणतात हि खंत अनेक दिगदर्शकांना असते.. कित्येकजण त्यांच्यासमोर उघड बोलून दाखवत नसले तरीही..
मग समीक्षक आणि त्यांच्या समीक्षणाची खरच गरज आहे का? तर ती आहे असंच म्हणायला हवं.. कित्येकदा सुंदर पब्लिसिटीच्या पॅकिंगमध्ये दडवून खराब माल आपल्या माथी मारायचा प्रयत्न करणाऱ्या मेकर्समुळे आपल्याला त्यांची गरज आहे, सिनेमाची काही दुर्लक्षित अंग आपल्याला दाखवून देण्यासाठी त्यांची गरज आहे.. प्रत्येक सिनेमाची निर क्षीर परीक्षा व्हावी यासाठी त्यांची गरज आहे आणि समीक्षण वाईट येईल या भीतीने तरी बरा सिनेमा करावा म्हणून काही दिग्दर्शकांना समीक्षकांची खूप गरज आहे! (पण तेच त्यांना मनावर घेत नाहीत राव!)
पण या साऱ्या गरजा तेव्हाच पूर्ण होतील जेव्हा समीक्षण हे पूर्वग्रहदूषित नसेल.. पण मराठीमध्ये असं फार थोडक्या समीक्षकांबाबतीत घडतं (असं आम्ही ऐकून आहोत!) आणि काही उदाहणामध्ये समीक्षकांचं पूर्वग्रहदूषित असणं खरंच असावं असा संशय यावा या लेव्हलचं समीक्षणहि आपण पाहतो.. म्हणूनच मोठ्या ब्रँडच्या टुकार सिनेमांनाहि कधी कधी 5 पैकी 4 स्टार (किंवा जे काही रेटिंग ते देत असतील ते) मिळतात तर समीक्षकांनी झोडपलेला एखादा सिनेमा पाहिल्यावर 'अरे हा तर चांगला होता की' असं नकळत आपल्याला वाटून जातं.. कधी एक समीक्षक खूप चांगलं बोलतो तर त्याच वेळी दुसरा नाकं मुरडतो.. कधी एखाद्या ठराविक निर्माता दिग्दर्शकाच्या सिनेमाला समीक्षक उचलून धरतो तर कधी एखाद्याला टार्गेट केल्यासारखं त्याच्या प्रत्येक कलाकृतीची पिसं काढतो.. हे सारं पाहिल्यावर समीक्षण किती खरं, किती खोटं हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.. तरीही आपण या समीक्षा वाचून ऐकून सिनेमा पाहायचा का नाही ते ठरवतो आणि प्रत्येक दुर्लक्षित होणाऱ्या मराठी सिनेमाचा फटका हा ओव्हर ऑल मराठी चित्रपट सृष्टीला बसतो..
त्यामुळे प्रेक्षकांनी समीक्षण वाचताना काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्याच.. समीक्षण, रिव्ह्यू हे टोटली एका व्यक्तीचं त्या सिनेमाबद्दलचं पर्सनल मत असतं.. त्या व्यक्तीला कदाचित कार्ल आवडत असेल जे तुम्हाला आवडत नाही, त्याला कदाचित हिरवा रंग आवडत असेल जो तुम्हाला रुचत नाही.. इतकं ते मत पर्सनल असतं, त्यामुळे ते प्रमाण मानणं हे केवळ चूकच.. त्यामुळे रिव्ह्यू पाहून , वाचून सिनेमा बद्दल लगेच मत बनवू नये (त्यात फेसबुकवर रिव्ह्यूच्या नावावर सिनेमाची कथा लिहिणाऱ्या फुकट्या समीक्षकांपासून तर लांबच रहा) सिनेमाचे ट्रेलर पहा, मनापासून तो पहावासा वाटत असेल तर नक्की पहा (मोबाईलवर, पायरेटेड नाही) आणि पाहून झाल्यावर मग आपलं मत बनवा (पण म्हणून लगेच समीक्षक बनू नका) प्रत्येक सिनेमात पाहण्यासारखं काहीतरी असतंच (अगदी टुकार सिनेमे वगळता, पण त्यातही ते कसे टुकार आहेत हे पाहणं गमतीचं असतं) त्यामुळे समीक्षण रेफर करा पण नेहमी सिनेमा पहायचा का नाही याबद्दल 'मन कि बात' ऐका..
मराठी सिनेमासाठी चांगला काळ म्हणता येईल अशी ही वेळ आहे, प्रत्येक चांगला मराठी सिनेमा प्रेक्षकांनी पाहिला तरच हि वेळ टिकेल आणि हि गोष्ट प्रेक्षकांनी आणि सोबत समीक्षकांनीहि ध्यानात घ्यायला हवीच.. त्यांनी समीक्षा कशी लिहावी हे त्यांचा विषय आहे पण एखाद्या बऱ्या सिनेमाला झोडपताना प्रेक्षकांनी अगदीच त्याच्याकडे पाठ फिरवू नये अशी काळजी त्यांनी घेतली तर मराठी सिनेमा जरा तरी तग धरेल आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच शुक्रवारी रिव्ह्यू न टाकता सोमवारी टाकला तर ज्यांनी चित्रपट पहायचा विचार केला असेल ते विकेंडला थिएटरमध्ये जाऊन तो पाहतील तरी!
असो, तर बॉटम लाईन हि कि कुठलाही सिनेमा परिपूर्ण नसतो, काढायला गेलं तर अगदी टायटॅनिक सिनेमातहि काही न काही दोष आहेतच हे समीक्षकांनी डोक्यात ठेवावं आणि शोले आला होता तेव्हा त्याचा पेपर रिव्ह्यू अतिशय टुकार सिनेमा असा आला होता हे रिव्ह्यूवाचून सिनेमाला जाणार्यानी लक्षात ठेवावं..
- ॐकार मंगेश दत्त

Comments

Popular posts from this blog

ने मजसी ने

ज्याचं शासन असतं तो स्वतःचेच विचार तिथल्या जनतेवर लादतो.. इतिहासाने ते दाखवून दिलय नेहमी.. लोकशाहीही त्याला अपवाद नाही.. म्हणूनच कदाचित आपल्याकडे जितके गांधी शिकवले गेल...

मराठी सिनेमा via काकण

उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं स...

Havai'Jaau Dya!'

एखाद्या सिनेमाची जाहिरात पाहुन आपण लगेच ठरवून टाकतो की हा सिनेमा पहायचाच.. 'हवाइजादा' ची जाहिरात पाहुन माझं हेच झालं होतं.. आणि का होणार नाही!! विषयच असा होता.. शिवकर तळपदे नाव...