उद्या काकण सिनेमगृहात एक आठवडा पूर्ण करेल.. या एका आठवड्यात लोकांचा मिळालेला प्रतिसाद अवर्णनिय होता.. लोक थिएटरला जावून सिनेमा पाहतायत.. बरेचसे शोज हाउसफुल झालेयत..इतकं सारं छान छान आहे, पण....
कित्येक मराठी सिनेमांना ग्रासुन गेलेला हा 'पण' काकणच्या ही वाट्याला येतोय याचं दुःख आहे.. पहिल्या आठवड्यात अनेक थिएटर यशस्वीरित्या गाजवूनही येणाऱ्या दुसऱ्या आठवडयात काकणला थिएटर मिळत नाहिएत.. जणू हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात चालणार नाहीच असं गृहीत धरलय.. जेव्हा की नेहमीच गणित हे सांगतं की जो चित्रपट पहिल्या आठवड्यात चांगला बिजनेस करतो तो दुसऱ्या आठवड्यात तूफ़ान चालतो.. लोकांवर चांगल्या आशयघन सिनेमाची जादू पसरायला जो वेळ लागतो तो जर तशा मराठी सिनेमांना मिळणारच नसेल तर काय फायदा..
कालच मी थिएटरमध्ये जावून ब्योमकेश बक्शी पाहिला.. त्याचा तीसरा आठवडा सुरु आहे (I guess) पण तरीही त्याचे भरपूर शोज आहेत.. इतर काही अमराठी सिनेमे तर 5-6 आठवडे होवून गेले तरी थिएटरमध्ये झळकतायत.. मग मराठी सिनेमाशीच हा दुजभाव का? जेव्हाकी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये दाखवण्याबद्दल मराठी सिनेमा निर्माते हिंदी किंवा इतर कुठल्याही सिनेमापेक्षा अधिक शेयर थिएटर्सना देतात.. त्यात मल्टीप्लेक्सची दादागिरी असते ती वेगळीच.. मी आणि DOP Raja Satankar ओबेरॉय गोरेगाव येथे एक मराठी सिनेमा पहायला गेलो होतो.. तिकीट मिळवण्यासाठी आम्हाला अर्धा तास थांबाव लागलं होतं.. पाच प्रेक्षक जमल्याशिवाय तिकीट देणार नाही असा रूल होता.. अन्यथा शो कॅन्सल..
अशा अनेक दिव्यांमधून मराठी सिनेमाला जावं लागतय.. काही तुरळक मोठे कॉर्पोरेट निर्मात्यांचे सिनेमे यातून सहज बाहेर पडतात पण उरलेल्या 90% इंडिपेंडेंट निर्मात्यांना या चरख्यातुन जावं लागतच.. त्यांचा सिनेमा तग धरत नाही आणि एक प्रोड्यूसर मराठी सिनेमाला कायमचा रामराम ठोकतो.. त्यामुळे सिनेमा बनवणार्यांनाही दर वेळी नवी वीटी नवा दांडू या नियमा प्रमाणे नव्याने नव्या निर्मात्यावर मेहनत करावी लागते.. यातूनच तडजोड़ी सुरु होतात आणि मराठी सिनेमाचं निर्मितीमूल्य घसरु लागतं..
या साऱ्या प्रॉब्लमच्या विरोधात काही राजकीय पक्ष मराठी सिनेमाच्या पाठीशी उभे आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.. पण हा प्रॉब्लम कायमचा सुटावा यासाठी फक्त मराठी सिनेमे थिएटरमध्ये लागून उपयोगाचं नाही तर ते चालणंही तितकच किंबहुना त्याहुन जास्त गरजेचं आहे.. 'जो बिकता है वो दिखता है' हा या काळाचा नियम आहे.. मराठी सिनेमा बिकेगा तो जरूर दिखेगा, पण आपण सारेच मराठी सिनेमाबद्दल इतके उदासीन झालोय की ना मराठी सिनेमा बिकत आणि ना दिखत..
मी आणि राजा दादा जो मराठी सिनेमा पहायला गेलो होतो त्याची तिकीट अर्धातास थांबल्यावर फाइनली आम्हाला मिळाली.. 5 प्रेक्षक जमले आणि त्यांच्या कृपेने शो सुरु झाला.. 5 प्रेक्षकांमध्ये आम्ही दोघ्ं होतो.. त्या व्यातिरिक्त एक म्हातारे आजोबा होते आणि अखेरचे दोघे होते एक अमराठी प्रेमी युगल ज्यांना आपल्या प्रेमासाठी रिकाम थिएटर हवं होतं.. त्यांनी एकदाहि त्या पदद्यावर काय सुरु आहे हे पाहिलंही नाही..
हे दृश्य पाहुन मन सुन्न झालं अगदी.. आपण इतके उदासीन आहोत आपल्या भाषेतल्या सिनेमाबद्दल.. चांगले सिनेमे देवूनही मराठीची हीच दुर्दशा होणार असेल तर काय फायदा.. आपण हे चित्र बदलण्यासाठी काही करणार का? आपण थिएटरमध्ये जावून मराठी सिनेमा पाहणार का?
प्रश्न अनेक आहेत.. ज्याची उत्तरं मी नाही देवु शकत.. प्रत्येक मराठी माणसाने त्याची उत्तर द्यायला हवीत.. शब्दातून नाही तर कृतितुन.. दयाल ना! प्रत्येक मराठी सिनेमा थिएटरमध्ये वाट पाहतोय.. तुमच्या उत्तराची..
पोस्ट जरा मोठी आहे पण विषयही फार छोटा नाहीच ना.. आवर्जून वाचा आणि विचार करा.. प्रत्येक माणूस बदल घडवू शकतो..
Comments
Post a Comment