
खोखो सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा हा किस्सा! सातार्यात 'माहुली' नावाचं क्षेत्र आहे.. फार सुंदर मंदिर.. तिथे आम्ही भरत दादा आणि प्राजक्ता सोबत 'हलकेच नजर भिडली' या गाण्याचं शूट करत होतो..तिथेच हे मारुतीराय दिसले.. प्रसन्न रूप, हसरी मुद्रा.. त्या दिवशी शनिवार का असच काहीतरी होतं.. आमचं सारं शूटिंग यूनिट मारुती रायांना खुश करण्यासाठी हार, फुलं असं बरच काही वाहू लागले.. यूनिटमध्ये भक्तीचा पुर आला.. अखेर न रहावुन आपणही या मारुतीरायांच्या पाया पडून यावं असं मलाही वाटलं.. मी गेलो.. पाया पडलो.. बरं वाटलं.. तोवर हा जागृत स्वयंभू मारुती आहे वगैरे बरच काही यूनिटमध्ये पसरलं होतं.. लंचपर्यंतचं शूटिंग सुरळीत पार पडलं.. वाटलं मारुती रायाचीच कृपा म्हणायची.. त्याला धन्यवाद म्हणण्यासाठी मी आपला जागृत स्वयंभू मारुतीराया समोर जावून उभा राहिलो.. माझी ती मूक प्रार्थना सुरु असताना तिथला लोकल प्रोड्क्शन पाहणारा माझा मित्र माझ्या जवळ आला.. "छान बनवलाय ना?" तो मारुतीकड़े पाहून म्हणाला.. मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही.. स्वयंभू मारुती, बनवलाय? मी त्याला विचारल्यावर गम्मत कळली.. आमच्या आधी तिथे दबंग 2 या हिंदी सिनेमाचं शूटिंग झालं होतं.. त्यांनी त्यांच्या सेटचा भाग म्हणून हा 'जागृत स्वयंभू' मारुती बनवला होता.. तो मारुती खोटा(?) होता.. सेटचा भाग होता.. मला माझच हसू आलं.. देवाची व्याख्या आपल्या मनात इतकी घट्ट रूजली आहे की आपण दगडातही देव शोधून मोकळे होतो.. देव आपल्याला बनवतो की आपण मनाला येइल त्याला देव बनावुन आपण स्वत:लाच बनवतो? अर्ध आयुष्य सेट वर घलावल्यावर मला हा सेट ओळखता येवू नये ही नजरेची चुक का श्रध्देची.. माझे हे विचार सुरु असतानाच डांस स्टेप करता करता प्राजक्ताचा पाय मुरगळला.. सगळे तिथे पळाले.. मी ही गेलो.. प्रोड्क्शन वाल्यानी प्राजाक्ताला डॉक्टरकड़े नेलं.. शूटिंग काही काळासाठी थांबल.. सगळे पांगले.. मला पुढे शूट कसं होणार याचं टेंशन होतं.. त्याच वेळी आमची हेअर ड्रेसर दिसली.. हात जोडून प्राजक्तासाठी मनोभावे प्रार्थना करणारी.. समोर तोच मारुती होता.. मूर्ति जरी खोटी असली तरी भक्ति खरी होती, तिचा विश्वास खरा होता..
प्राजक्ता मलमपट्टी करून परत आली.. पाय बरा झाला नव्हता पण तिने पुढचं सगळ शूटिंग केलं.. अशक्य होतं पण शक्य झालं.. यात त्या मारुतीची कृपा का हेअरड्रेसरच्या भक्तीचा चमत्कार? माहीत नाही?
मनापासून प्रार्थना केल्यावर ऐकणार कुणीतरी बसलंय हे मात्र नक्की.. देवळ मंदिरं मूर्ती यांच्या पार तो आहे.. त्याला शोधण्यापेक्षा त्याला साद घालण महत्वाचं.. मनापासून आणि विश्वासाने!!
आवडून गेला हा लेख
ReplyDelete